।। श्री ।।
स्थापना १९२८ नोंदणी क्रमांक: ए २२३६
मुंबईचा राजा, गणेशगल्ली
mumbaicha-raja
-->

इतिहास मंडळाचा

मुंबईच्या सुतगिरणीचा बालेकिल्ला असलेला, प्रामुख्याने गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा हा लालबाग...गिरणीत काम करण्यासाठी मोठया प्रमाणात कोकणातून आलेला मराठी मध्यमवर्गीय माणूस हा लालबाग-परळ-शिवडी-वरळी इत्यादी मध्य मुंबईत व्यस्त राहात असे. या सर्वांची मोठी बाजारपेठ म्हणजे "लालबाग" होते. हा बाजार मोठया प्रमाणात पेरूची चाळ जाम मिल कंपाऊंड येथे होता. त्याला मोगलमिल कंपाऊंड म्हणुन ओळखत असे. गणेश चतुर्थीस पूजा साहित्य, श्री मुर्ती बाजार, दसरा-दिवाळी बाजार किंवा मसाला बाजार खरेदीसाठी येथे मोठया प्रमाणात मराठी माणसाची दुकाने होती.

त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्मितीची चळवळ ही उत्सव माध्यमातुन लोक जागृती व एकजुट करण्याची विचारधारणा लक्षात घेऊन विभागातील काही कार्यकर्त्यांनी सन १९२८ साली “ लालबाग सर्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरुची चाळ येथे केली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस या विभागात होत असे. भजने, किर्तने, भारुड इत्यादी कार्यक्रम होत असत. या उत्सवामागे व्यापारी वर्गाने गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे फार मोठे कार्य केले. पुढे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन येथे स्थलांतरित करण्यात आला. उत्सवाचे स्वरुप व त्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेउन त्याच बरोबर वाढत्या लोकवस्तीचे प्रमाण विचारात घेऊन कै. अंबाजी मास्तर व काही तडफदार उत्साही कार्यकर्त्यांनी १९३७-३८ साली हा उत्सव गणेशगल्लीे परिसरात म्हणजेच आत्ता जेथे जागेचे देवस्थान आहे तेथे आणला. त्याच काळात हा श्री गणेश उत्सव अकरा दिवस साजरा करण्यास सुरवात होऊन शारदामातेचा नवरात्रौत्सव साजरा करण्यास सुरवात झाली. या उत्सवात वाडिया, चिंचपोकळी, काळाचौकी, करिरोड, जेरबाईरोड, मेघवाडी पासुन संपूर्ण जुने लालबाग सहभागी होते. १९४२ साली या उत्सव कार्याला फार महत्व प्राप्त होऊन या उत्सवाच्या माध्यमातुन स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे श्रीं च्या पुढे ठेवण्यात येऊ लागले आणि उत्सव हा लोक जागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रमुख्याने स्वातंत्र्य चळवळीची भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोक शिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. १९४५ साली सुभाषचंद्र बोस "श्री" रुपाने स्वराज्याचा सुर्य सात घोडयांचा देखावा स्थापून लोकांसमोर सादर करण्यात आला त्यावर्षी लोकांचा प्रतिसाद पाहून ४५ दिवसांनी श्रीं चे विसर्जन करण्यात आले, याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. हा देखावा कै.राजापुरकर मुर्तीकार ह्यांनी साकारला होता. सन १९४७ नंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे श्रीं पुढे सादर करण्यात आले.

या सर्व कलाकृतींना चांगली प्रसिध्दी मिळाली आणि लालबागच्या गणेशगल्ली येथील उत्सवाला लोकांची गर्दी होऊ लागली. त्याच बरोबर लहान मुलांचे मेळे, करमणुकिचे कार्यक्रम पाहाण्याची संधी लोकांना मिळत गेली. हे फक्त त्यावेळी चार आणे वर्गणी आणि थोडीफार देणगी देऊन साजरे होत होते. त्याचप्रमाणे नवरात्रौत्सवात सुध्दा उत्तम प्रकारे करमणुकिचे कार्यक्रम विभागातील नागरिकांकडून केले जात होते. व्यावसायिक नटांची दोन दर्जेदार नाटके होत होती. १९५०-५१ या काळात उत्सव मंडळाची नोंदणी मा. आयुक्त-धर्मादाय संस्था यांच्याकडे करण्यात आली. किमान वर्गणी फक्त आठ आणे करण्यात आली. श्रीं ची मूर्ती आणि सजावट हे प्रमुख उत्सवाचे भाग मुर्तिकार मोहन शेडगे, राम सारंग, श्याम सारंग यांनी वेळोवेळी साकारून याला योग्य सजावटीचा आकार राजकमल मंदिर यांच्या सहकार्याने कै. गोविंदराव आणि सखाराम शिळकर बंधुनी दिला. यामुळे उत्तम सजावट व आकर्षक मुर्तीसाठी नावलौकिक मिळविलेले गणेशगल्ली येथील देखावा पहाण्यासाठी संपुर्ण मुंबापुरी लोटू लागली आणि या उत्सव मंडळाला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळू लागली. त्याचप्रमाणे राज्यशासनाच्या तोडीची हौशी नाटयस्पर्धा या मंडळाने सुरु करुन जनतेला दर्जेदार नाटय पहाण्याची संधी दिली. नाटयस्पर्धेमुळे मंडळाला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याबरोबर मंडळाने एक धाडस करुन महाराष्ट्राची सांस्कृतीक कला म्हणुन ओळखला जाणारा तमाशा ही लोककला मुंबईत उघडया मैदानात सादर केली. कै. दादू मारुती इंदूलकर यांचा "गाढवाच लग्न" हा वग उत्सवात सादर केला गेला. त्याच बरोबर पप्पादेवी बंगळोरकर यांची संगीतबारी सुध्दा गणेशगल्ली, गणेश मैदानात सादर करुन एक नविन प्रेक्षक तमाशाला दिला. जनतेने सुध्दा त्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि नंतर या मुंबईत तमाशा केलेल्या कलाकारांना उघडया मैदानातुन प्रयोग करण्याची संधी मिळाली. याच काळात उत्सव मंडळाने खास "वसंत व्याख्यानमाला" आयोजित करुन जनतेला मोठया विचारवंतांची भाषणे ऐकण्याची संधी दिली. विभागातील लोकवस्ती लक्षात घेता मराठी कार्यक्रमांसोबतच गुजराती कार्यक्रम, नाटक सादर करण्यात येत असत. त्याचा उत्सव कार्यात मोठा सहभाग आहे. हा उत्सव लालबागच्या जनतेचा आणि व्यापारी वर्गाच्या चार आणे वर्गणीतुन सुरु झाला व त्यांच्याच आर्थिक सहकार्यामुळे मंडळाची आज स्वत:च्या कचेरीसाठी प्रशस्त जागा आहे. मंडळाची धुरा पुढे यशस्वीरित्या वाहुन नेण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची मोठी शक्ती आज मंडळाकडे आहे.

गणेश गल्लीचा गणराज झाला मुंबईचा राजा…

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ. मंडळाची स्थापना सन १९२८ साली झाली. मंडळाचे हे ९२ वे वर्ष आहे.

एका समांतर रेषेत मागे वळून पाहिले असता आपल्या लक्षात येईल की, मंडळाने सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात संपुर्ण हिंदुस्थानातील पहिली २२ फुटी गणरायाची उंच उत्सव मुर्ती बनविली व लालबाग हे नाव जगविख्यात केले. त्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात भव्य व नेत्रदिपक अश्या सजावटीवर भर देऊन दक्षिण भारतामधील मदुराई येथील प्रसिद्ध अश्या मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती भविकांसमोर साकारली. अमृतमहोत्सवी वर्षानंतर २२ फुटी उंच गणराया सोबत आकर्षक सजावट हे मंडळाचे समिकरण बनून गेले. त्यामुळेच "लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ-गणेशगल्ली" म्हणजे "भव्यतेची परंपरा व संस्कृतीची जोपासना" हे समिकरण जनमानसात उमटले.

भारतातील विविध तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे काहींना वेळे अभावी व आर्थिक अडचणीमूळे पाहता येत नाहीत तेव्हा विविधतेने नटलेल्या भारतातील या स्थळांचा आनंद भक्तांना घेता यावा या विचाराने उत्सव मंडळाने भव्य-दिव्य देखावे उभारण्यास सुरवात केली. मदुराईचे मिनाक्षी मंदिर, राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, सुवर्णलंका, हिमालय-केदारनाथ मंदिर आणि म्हैसुरचे चामुंडेश्वरी मंदिर इ. देखावे सादर केले. भाविकांनी हे सर्व देखावे अक्षरश: डोक्यावर घेतले व विविध नामांकित संस्थांनी पारितोषिके देऊन मंडळास वेळोवेळी गौरविले.

सन २००४ साली मंडळाने आपल्या गणेशाची ख्याती जन मानसात तसेच भक्तांच्या मुखी सहज रहाण्यासाठी गणेशास "मुंबईचा राजा" असे प्रचलीत करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला व एक दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करून मंडळाचे वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक व प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत माजी अध्यक्षांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले. मोठया दिमाखदार कार्यक्रमाने मंडळाने आपला गणेश '' मुंबईचा राजा “ म्हणुन सर्वोन्मुख केला.

पाद्यपुजन सोहळा :

गणरायाच्या पावलांची पुजा करून मंडळाच्या सर्व कामांना सुरूवात केली जाते. मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार व मुर्तिकार यांच्या हस्ते गणरायाच्या पावलांची पुजा-अर्चा केली जाते. ह्या कार्यक्रमामध्ये विभागातील तसेच मुंबईतील भाविकांची आणि देशी-विदेशी पाहुण्यांची मांदियाळी असते.

सत्यनारायणाची महापुजा :

गणेशोत्सव काळात मंडळातर्फे सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात येते. अनेक भाविक पुजा करून तिर्थ प्रसादाचा लाभ घेतात.

विसर्जन मिरवणुक :

अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या हया मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गणेशगल्ली परिसरातून सकाळी ठीक ८:०० वाजता निघते. हया दिवसाचे आणि हया मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतून विसर्जना करिता निघण्याचा पहिला मान हा आपल्या मुंबईच्या राजाचा असतो आणि त्या नंतर इतर मंडळे गणेश विसर्जनाकरिता मार्गस्थ होतात. ढोल - ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि लाखो भाविकांचा जनसमुदाय हे हया विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असते. विसर्जन मिरवणुक गणेशगल्ली परिसर, डॉ. एस.एस. राव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, आर्थर रोड, सात रस्ता, लॅमिंगटन रोड हया मार्गे गिरगाव चौपाटी पर्यंत उत्साहात व जल्लोषात चालु राहते.

murtikar

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व मुर्तिकार दिनानाथ वेलिंग..

सन १९७७ उत्सव मंडळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष मंडळाला कलाटणी देणार ठरले. १९२८ साली स्थापना झालेल्या मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. या ५० व्या वर्षी काहीतरी वेगळे करावे असे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होते. पण वेगळे म्हणजे नक्की काय ते मात्र ठरत नव्हते. या पूर्वी मंडळाच्या वतीने चलचित्र, देखावे यांच्यासारखे विविध प्रकार गणेशोत्सवात सादर केले जात होते. परंतु या सुवर्ण महोत्सवात एक वेगळा देखावा तयार करावा जेणेकरून हे सगळयांच्याच स्मरणात राहिल अस ठरवल जात होत, पण नेमक काय करायच ते उमजत नव्हत. आणि अशाच वेळी एक साधा सरळ असा अवलिया मुर्तिकार मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटले. त्या मुर्तिकाराने आपल्या हस्त कौशल्याने संपूर्ण हिंदुस्तानाला हादरूवुन सोडले. कामळामध्ये बसलेले २२ फुटी भव्य असे गणरायाचे भव्य दिव्य रूप हिंदुस्थानातील तमाम भक्तजनांसमोर सादर केले. या अवलिया मुर्तिकाराचे नाव होते '' दिनानाथ वेलिंग “.

मुर्तिकार दिनानाथ वेर्लिग यांनी उंच गणेश मुर्ति बनवण्याची संकल्पना सर्वप्रथम मंडळाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली. याच वर्षी मंडळाची सगळी मदार ही तरुण कार्यकर्त्यांच्या हाती आली होती, त्यामुळे या कल्पनेला तरुण रक्ताची जोड होती. उंच मुर्तीच्या या संकल्पनेला सर्वप्रथम कडाडून विरोध झाला होता. परंतु तरुण कार्यकर्त्यांनी ही संकल्पना साकारायचीच असा चंग च बांधला होता. मग काय सगळे कामाला लागले. सर्वप्रथम ही मुर्ति उभारायची कशी याची आखणी सुरु झाली. गणरायाचे विर्सजन व्यवस्थित व्हावे तसेच एवढी भव्य मुर्ती नेण्याकरिता लोखंडी ट्रॉली बनविण्यात आली. कार्यकर्ते अतोनात मेहनत घेत होते. तिकडे मुर्तिकार दिनानाथ वेलिंग जीव ओतून गणेश मुर्ती साकारण्यात मग्न झाले. आणि अखेर भव्य-दिव्य देखणे असे २२ फुटी गणराय भक्तां समोर साकार झाले, सगळयांच्याच मेहनतीचे चिज झाले. '' लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ’ हे नाव संपूर्ण देशात प्रसिध्द झाले.

देशाच्या कानाकोप-यातून या भव्य गणरायाचे दर्शन घेण्याकरिता भक्तांची तोबा गर्दी झाली. तासनतास लोक रांगेत उभे राहू लागले. अश्या प्रकारे नुसत्या महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या देशात या उत्सव मंडळाने उंच उत्सव-मूर्तीचा पायंडा घालुन दिला. हे वर्ष खरोखरच मंडळाकरीता सुवर्णमहोत्सवी ठरले. मंडळाची आर्थिक बाजू बळकट झाली. मंडळाने खरोखरच कात टाकली.

गणराय विसर्जनाकरिता जेव्हा निघाले तेव्हा संपूर्ण लालबाग लोकांनी फुलून गेले होते. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याकरिता ''ना भूतो ना भविष्यती" अशी गर्दी झाली. यानंतर मंडळाने मागे वळुन कधीच पाहिले नाही. आज पर्यंत मंडळाने ही उंच मुर्तीची परंपरा अविरत चालू ठेवली आहे. यानंतर वेलिंगानी अनेक देखण्या मुर्त्या लोकांसमोर सादर केल्या. १९७८ सालची कालिया मर्दन ही मुर्ति म्हणजे चमत्कार होता. ऐवढया मोठया मूर्तीचा संपूर्ण डोलारा गणरायाच्या पायाच्या अंगठयावर सावरण हा चमत्कार म्हणावा लागेल. वेलिंगांच्या रक्तातच कला भिनलेली होती. या माणसाने पैशासाठी कधीच मुर्त्या घडवल्या नाहीत. अश्या प्रकारे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व दिनानाथ वेलिंग हे नात अधिकच घटट् होत गेले.

१९९० साली आजारी असताना देखील मास्तर दीनानाथ वेलिंगांनी शेवटची मुर्ति बनवुनच या जगाचा निरोप घेतला. आजही त्यांच्या स्मृती उत्सव मंडळाने जपल्या आहेत. अशा अवलियास मुर्तिकारास मंडळाचा मानाचा मुजरा.

सामाजिक उपक्रम

कर्तव्यदक्ष निर्णय :

जुलै २०२१ मध्ये महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली होती. सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि सामाजिक कर्तव्याचे भान बाळगून उपरोक्त मंडळाच्या वतीने महाड व चिपळूण भागातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची सहाय्यता देण्याचा कर्तव्य दक्ष निर्णय जाहीर करण्यात आला.

गृहोपयोगी अन्नधान्यांचे मोफत वाटप :

शेफ विकास खन्ना यांच्या फीड इंडिया इनिशिएटिव्ह व लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली (मुंबईचा राजा) यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय वर्गणीदारांमधील अत्यंत गरजू लोकांना गृहोपयोगी अन्नधान्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

विभागीय वर्गणीदारांकरिता महत्वपूर्ण निर्णय :

वर्ष २०२० मध्ये कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले होते. अशा परिस्थितीत विभागीय वर्गणीदारांवर गणेशोत्सवाचा आर्थिक भार न टाकता त्यावर्षी गणेशोत्सवासाठी वर्गणीदारांकडून वर्गणी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईच्या राजा तर्फे घेण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी :

मार्च २०२० या वर्षी उद्भवलेल्या कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराची जी वैश्विक समस्या निर्माण झाली त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे साहेब ह्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुंबईच्या राजाच्या वतीने रु.५,००,०००/- मात्र धनादेश महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता सुपूर्त करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रामधील पूरग्रस्त नागरिकांना मदत :

उपरोक्त मंडळाच्या वतीने ऑगस्ट २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली इत्यादी भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व बरीच कुटुंबे बेघर होऊन तेथिल दैनंदीन जीवन विस्कळीत झाले होते. अश्या बिकट प्रसंगी मंडळाच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना ₹३,००,०००/- पर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

चिपळूण मधील अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत :

उपरोक्त मंडळाच्या वतीने जुलै२०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील अपघातग्रस्त कुटुंबियांना ₹५,००,०००/- पर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः त्या घटनास्थळी भेट देऊन तेथील कुटुंबियांना त्यांच्या दैनंदीन गरजेच्या वस्तू देऊन त्यांना मदतीचा हात दिला.

जांभुळपाडा मदतकार्य :

१९८१-९० सालामध्ये पनवेल येथील जांभुळ पाडा या आदिवासी वस्ती असलेल्या गावाला पुराचा भयंकर तडाका बसला. त्यांचे संपुर्ण जनजीवन विस्कळत झाले त्यांच्या हाकेला धावून जात मंडळाने तातडीने मदत कार्य सुरु केले. जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी वाटप करुन विस्कळीत झालेले त्यांचे जीवन पुन्हा एकदा स्थिरस्थावर करण्यात मंडळाचा मोलाचा वाटा आहे.

कारगिल रिलीफ फंड :

नैसर्गिक आपत्ती बरोबर अस्मानी आपत्तीतसुध्दा मंडळ नेहमी मदतकार्यास पुढे आहे. कारगिल युध्दाच्या वेळी जवानांनी प्रणाची बाजी लावुन देशाचे रक्षण केले. सरकारने केलेल्या आव्हानानुसार मंडळाने ₹१,००,००० (एक लाख रुपये) कारगिल रिलीफ फंडाकरिता दिले.

महाड - चिपळुण तालुक्यात शैक्षणिक मदत :

२६ जुलै २००७ साली संपुर्ण महाराष्ट्राने निसर्गाचा कोप अनुभवला. महाड - चिपळुण तालुक्यांना तर निसर्गाने अक्षरश: झोडपुन काढले. नद्यांना आलेला पुर, तसेच दरडी कोसळून झालेले नुकसान फार भयंकर होते. संपुर्ण देशातुन मदतीचा शोध सुरु झाला. सदर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचे पुनर्वसन महत्वाचा विषय बनला. यावेळी मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वहया, पुस्तके, दप्तर, गणवेश व इतर शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. दासगाव, जुई, चिपळुण, ई. गावांमध्ये मदत कार्य सुरु राहिले.

आदिवासी पाड्यामध्ये मोफत साडी वितरण आयोजन:

दर वर्षी नवरात्रौत्सवामध्ये लालबागच्या मातेला भाविकांकडून मनोवांचित इच्छा पूर्ण झाल्या निमित्ताने साड्यांचा नवस दिला जातो. स्त्री-शक्तीचा सन्मान करून उपरोक्त मंडळाच्या वतीने राज्यातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये भाविकांनी लालबागच्या मातेला अर्पण केलेल्या साड्यांचे मोफत वितरण करण्यात येते.

के. ई. एम स्ट्रेचर व्हील चेअर वाटप :

के. ई. एम रुग्णालयातील वाढती रुग्णांची गर्दी लक्षात घेता रुग्णांच्या सोयीकरता रुग्णालयात स्ट्रेचर व व्हील चेअर चे लोकार्पण करण्यात आले. प्रती वर्षी उपयोगी वस्तुंचे लोकार्पण करण्याचा मंडळाचा मानस आहे.

रक्तदान शिबीर :

रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान या उक्तीचा आधार घेऊन मंडळ गेली १५ वर्षे रक्तदान शिबीर आयोजित करत आले आहेत. के.ई. एम रक्त पेढी, नायर रुग्णालय, जे. जे. महानगर रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर सुरळीत पार पाडले जाते. रक्तदात्यास मंडळाच्या वतीने आकर्षक भेट वस्तु देण्यास येते, सुमारे १००० ते १५०० रक्तदाते सदर उपक्रमात सहभागी होतात .

आरोग्य शिबीर :

जनतेच्या आरोग्याकडे मंडळ विषेश लक्ष ठेवून असते. गणेशोत्सवात जमलेला निधीचा विनियोग काही अंशी आरोग्य शिबीर आयोजनात केला जातो. यात प्रामुख्याने संपुर्ण शरीर तपासणी, मघुमेह, रक्तदाब, नेत्र चिकीत्सा, ई.सी.जी., दंत चिकीत्सा, अस्थिव्यंग, अस्थमा, बाल रोग, तसेच कर्करोगा सारख्या महागडया तपासण्या केल्या जातात. या शिबीरात के.ई. एम. रुग्णालय, जे.जे. रुग्णालय, नायर रुग्णालय या नामवंत रुग्णालयाच्या डॉक्टरांचा समावेश असतो. प्रतिवर्षी असे शिबीर आयोजित केले जाते.

ग्रामिण आरोग्य शिबीर :

मुंबई बरोबरच उत्सव मंडळ ग्रिमण भागातही मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन सातत्याने करत असते. अतिशय दुर्गम भागात आरोग्यसेवेचे कार्य करताना मंडळाला अतिशय आनंद होतो. आजपर्यंत नरसोबाची वाडी, सैनिक टाकळी , ठाणे जिल्ह्यातील वांगणी गाव या सारख्या भागांमध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

नेत्र चिकित्सा व चश्मा शिबीर :

आरोग्य शिबीरानंतर चश्मा शिबीराचे आयोजन केले जाते. त्या मध्ये प्रमुख्याने विख्यात व निष्णांत नेत्रचिकित्सकां मार्फत डोळे तपासले जातात. विषेश म्हणजे माननिय डॉ.तात्याराव लहाने (अधिष्ठित, जे. जे. रुग्णालय) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी होते. गंभीर समस्या असलेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात नेऊन मोफत उपचार केले जातात, तसेच इतर रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप केले जाते.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया :

मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी मोफत मोती-बिंदु शस्त्रक्रियेचे आयोजन केले जाते. नेत्रचिकित्सा शिबीरात आढळलेल्या मोतिबिंदु सदृश रूग्णाचे जे.जे. रूग्णालयतील प्रसिध्द नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया केली जाते सदर शिबीरात भारतातील कोणी ही व्यक्ती सहभागी होऊ शकते.

शैक्षणिक उपक्रम

गुणगौरव सोहळा :

मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थांना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो.सदर उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते व सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके देऊन त्यांचा सन्मान केला जातो. वर्षानुवर्षे या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत मंडळाच्या वतीने वाढ केली जाते. तसेच इतर स्पर्धापरीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा मंडळातर्फे विशेष सत्कार केला जातो.

उन्हाळी छंद वर्ग शिबिर:

शालेय मुलांच्या वार्षिक परीक्षा आटोपल्यानंतर त्यांच्या अंगीकृत कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाच्या वतीने "उन्हाळी छंद वर्गाचे" आयोजन केले जाते. ह्या उपक्रमामध्ये तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत अभिनय, सुलेखन, गायन, सूत्रसंचलन, व्यक्तिमत्व विकास इत्यादी कलाक्षेत्रातील विषयांवर कार्यशाळा आयोजित केली जाते.

पारितोषिक व सन्मान

अनेक मान्यवर व प्रतिष्ठित संस्थांतर्फे 'मुंबईचा राजा' ला विविध पुरस्कार व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

१. काळाचौकी पोलिस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धा २००९ शिस्तबध्द सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ - प्रथम क्रमांक.

२. काळाचौकी पोलिस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धा २०१० “उत्कृष्ट देखावा“.

३. '' इंटरनेटचा राजा “.

४. स्टार माझा आयोजित (स्टार बाप्पा) ''सर्वोत्तम गणपती स्पर्धा - २००८“ मुंबई विभाग.

५. '' बेस्ट सिक्युअर्ड गणेश मंडळ - २००९“.

६. रक्त संक्रमण औषध शास्त्र विभाग ''रक्तदात्यास रक्तदान प्रेत्साहन दिल्याबदद्ल सन्मानार्थ पुरस्कार “.

७. '' बेस्ट सिक्युअर्ड गणेश मंडळ - २०११“.

८. काळाचौकी पोलिस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धा २००७ ’उत्कृष्ट देखावा“.

९. '' बेस्ट सिक्युअर्ड गणेश मंडळ - २०१०“.

१०. दिवा शहर-ठाणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रस्तुत सामाजिक एकता व आध्यात्मिक जागृती गणेशोत्सव स्पर्धा २०११.

११. लोकसेवा आणि लोकमत आयोजित ''श्री गणेश दर्शन स्पर्धा २००७ “.

१२. ई-टीव्ही मराठी आयोजित ''उत्कृष्ट गणेश मंडळ“.

१३. के.ई. एम. रुग्णालयाला रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल किऑस्क दिल्याबद्दल उपरोक्त मंडळाला "उत्कृष्ट डिजिटल संकल्पना" हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

१४.संस्कृती जतन प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या वर्ष २०१८ च्या मुंबई सार्वजनिक गणेशोत्सवा मध्ये "लक्षवेधी उत्सव मूर्ती" चा सन्मान "मुंबईच्या राजाला" देण्यात आला.

१५.संस्कृती जतन प्रतिष्ठान तर्फे "लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ,गणेश गल्ली (मुंबईचा राजा)" मंडळास सामाजिक कार्य केल्या बद्दल त्यांना "लोकमान्य सन्मान" देऊन २३ जुलै२०१९ रोजी गौरवण्यात आले.

१६.ऑगस्ट २०१९ रोजी सामाजिक कार्यामध्ये अमूल्य योगदान दिल्याबद्दल वोक्कार्ड रुग्णालयातर्फे मुंबईच्या राजाचा सन्मान करण्यात आला.

१७.एंटरटेनमेंट ट्रेड संस्थेतर्फे यंदाच्या आपल्या मुंबईच्या राजाच्या उत्सव मूर्तीस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

१८.संस्कृती जतन प्रतिष्ठान यांच्या वतीने बाळ गंगाधर टिळक यांच्या १६४ व्या जयंतीचे औचित्य साधुन "लोकमान्य सन्मान २०१९-२०२०" हा पुरस्कार उपरोक्त मंडळास जाहीर करण्यात आला.

लक्षवेधी देखावा - अयोध्या राम मंदिर

कार्यालय संपर्क

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली

९/१० कल्याणी निवास,
गणेशगल्ली, लालबाग, मुंबई, महाराष्ट्र ४०००१२. भारत

देणगी

Bank name : Bank of Baroda
Account No. : 33380100002204
Bank IFSC : BARB0LALBAU [Fifth character is zero]

बस व्यवस्था

  • १. लोअर परळ ते गणेशगल्ली : ४४, ५५, ५७, १६६
  • २. चिंचपोकळी ते गणेशगल्ली : ३० लिमिटेड, ६३, ६६, २१ लिमिटेड
  • ३. कॉटनग्रीन ते गणेशगल्ली : ४३, ४४, ६७, १३४
  • ४. एलफिस्टन ते गणेशगल्ली : ५२